Home >> IN Today's News >> Current Affairs | चालू घडामोडी – ०५ ऑक्टोबर २०२१

Current Affairs | चालू घडामोडी – ०५ ऑक्टोबर २०२१

Current Affairs | चालू घडामोडी – ०५ ऑक्टोबर २०२१

 

MPSC – राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर :
 • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अखेर आज बहुप्रतिक्षित अशा राज्यसेवा पूर्व परीक्षा – २०२१ व मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. करोना महामारीमुळे या परीक्षा लांबणीवर पडल्या होत्या. आयोगामार्फत आता २९० पदांसाठी १७ संवर्गात भरती केली जाणार आहे. तसेच, याबाबतची विस्तृत माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
 • या परीक्षासंदर्भात आयोगाने ट्विटद्वारे देखील माहिती दिली असून, त्यानुसार २ जानेवारी २०२२ रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यभरातील ३७ जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
 • पूर्व परीक्षेच्या निकाला आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी मुख्य परीक्षा ७, ८ आणि ९ मे २०२२ रोजी किंवा त्यानंतर आयोजित होण्याची शक्यता आहे.
 • या परीक्षेसाठी परीक्षार्थ्यांना उद्या (५ ऑक्टोबर) दुपारी दोन वाजेपासून अर्ज करता येणार आहे. तर, अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर आहे.
अमेरिकी वैज्ञानिकांना वैद्यकशास्त्राचे नोबेल :
 • अमेरिकेचे वैज्ञानिक डेव्हिड ज्युलियस आणि अर्डेम पॅटापॉशियन यांना २०२१चा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा नोबेल पुरस्कार करोना लस शोधणाऱ्या वैज्ञानिकांना दिला जाईल, असे अंदाज वर्तवले गेले होते.
 • ज्युलियस आणि पॅटापॉशियन यांनी तापमान, स्पर्श यांच्या संवेदना मेंदूत कशा निर्माण होतात याचा शोध संवेदक संकल्पनेच्या माध्यमातून घेतला आहे. त्यातून नवी वेदनाशामके तयार करण्यासाठी मदत होणार आहे, असे नोबेल पुरस्कार निवड समितीने म्हटले आहे. रॉयल स्वीडिश विज्ञान अकादमीच्या वतीने १.१५ दशलक्ष डॉलर्सचे नोबेल पुरस्कार दरवर्षी दिले जातात.
 • उष्णता, थंडी किंवा यांत्रिक बल यांच्यातून मेंदूपर्यंत संवेदना कशा जातात आणि त्यांचे विश्लेषण कसे केले जाते यावर त्यांनी संशोधन केले. त्याचा फायदा वेदनांपासून मुक्ती देणारी औषधे तयार करण्यासाठी होणार आहे. आपली चेतासंस्था ही उष्णता, थंडी आणि यांत्रिक बलास कसा प्रतिसाद देते याचे स्पष्टीकरण त्यांनी केले आहे.
 • गेल्या वर्षी  अमेरिकेचे हार्वे अल्टर आणि चाल्र्स राइस तसेच ब्रिटनचे मायकेल हॉटन यांना हेपॅटाटिस सी विषाणूच्या शोधासाठी वैद्यकशास्त्रातील नोबेल देण्यात आले होते.
जपानच्या पंतप्रधानपदी किशिदा :
 • जपानचे पंतप्रधान म्हणून संसदेने फुमियो किशिदा यांची निवड केली आहे. त्यांना आता करोनाची साथ व सुरक्षा आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे, याशिवाय राष्ट्रीय निवडणूक अटळ बनल्याचे सांगण्यात आले.
 • किशिदा हे योशिहिडे सुगा यांची जागा घेत असून त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. किशिदा व त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोमवारी झाला. सुगा एक वर्ष अधिकारपदावर होते. करोना साथ व ऑलिम्पिक काळात करोनाचा प्रसार या मुद्द्यांमुळे त्यांचा पाठिंबा कमी झाला होता.
 • माजी परराष्ट्र मंत्री किशिदा हे ६४ वर्षांचे असून ते नेमस्त नेते म्हणून प्रसिद्ध आहेत, पण काही वेळा त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्या आहेत. त्यांनी  स्थिरता व सलगतेसाठी निवडणुकांचा पर्याय निवडण्याचे निश्चित केले आहे. सुगा यांच्या मंत्रिमंडळातील वीस जणांना बदलण्यात आलेअसून त्यातील तेरा जण प्रथमच मंत्री झाले आहेत.
‘नीट’ परीक्षा रद्द करण्यासाठी स्टॅलिन यांचे १२ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र :
 • वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द करण्याच्या मागणीला पाठिंबा मिळविण्यासाठी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी बारा राज्यांकडे पत्राद्वारे पाठिंबा मागितला आहे.  त्यांनी याबाबत संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले असून शिक्षण क्षेत्रात राज्य सरकारचा प्रभाव असला पाहिजे, या घटनात्मक तत्त्वाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
 • विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना हे पत्र पाठवण्यात आले असून त्यात आंध्र प्रदेश, दिल्ली, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, राजस्थान, तेलंगणा, पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे.
 • स्टॅलिन यांनी पत्रात म्हटले आहे, की संबंधित राज्यातील ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना व वंचित गटांना या परीक्षांमुळे वैद्यकीय क्षेत्रात स्थान मिळत नाही. उच्च शिक्षण संस्थात ते प्रवेश घेऊ शकत नाहीत. त्यासाठी राज्य सरकारचे शिक्षण क्षेत्रात अधिपत्य निर्माण करण्यात मदत करावी.
 • प्रत्यक्षात शिक्षण हा विषय राज्यांच्या अखत्यारित आहे. त्यामुळे त्यात कें द्राने हस्तक्षेप करण्याचे कारण नाही. त्यासाठी संयुक्तपणे व एकजुटीने प्रयत्न करून नीट परीक्षा रद्द करण्याचा आग्रह  धरला पाहिजे. केंद्र सरकारने वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षा सुरू करणे हेच संघराज्यवाद व घटनात्मक समतोलाच्या विरोधात होते. त्यामुळे राज्यांचे वैद्यकीय प्रवेशातील अधिकार कमी झाले आहेत.
पँडोराप्रकरणी तपासाची ‘सीबीडीटी’तर्फे घोषणा :
 • केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी) अध्यक्षांच्या अध्यक्षतेखालील एक बहुयंत्रणा गट (मल्टि एजन्सी ग्रुप) पँडोरा पेपर्स प्रकरणांच्या तपासावर देखरेख ठेवणार असल्याचे सोमवारी एका अधिकृत निवेदनाद्वारे सांगण्यात आले.
 • उद्योगपतींसह तीनशेहून अधिक भारतीयांची नावे जगभरातील श्रीमंत व्यक्तींची आर्थिक मालमत्ता उघड करणाऱ्या ‘पँडोरा पेपर्स’मध्ये असून; भारतीयांपैकी अनेक जणांनी  आरोप नाकारले आहेत.
 • सरकारने याची नोंद घेतली असून, संबंधित तपास यंत्रणा या प्रकरणांचा तपास हाती घेतील आणि कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असे सीबीडीटीने एका निवेदनात म्हटले आहे.
 • ‘‘पँडोरा पेपर्स’ या नावाने माध्यमांमध्ये प्रकाशित झालेल्या प्रकरणांचा तपास सीबीडीटी अध्यक्षांच्या अध्यक्षतेखालील बहुयंत्रणा गटाच्या देखरेखीखाली केला जाईल. सीबीडीटी, सक्तवसुली संचालनालय (ईडी), रिझर्व्ह बँक आणि आर्थिक गुप्तचर विभाग (एफआययू) यांचे प्रतिनिधी या गटात असतील,’’ असे प्राप्तिकर प्रकरणांबाबत निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था असलेल्या सीबीडीटीने सांगितले.
जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धा – सांघिक कामगिरीमुळेच ऐतिहासिक रौप्यकमाई :
 • सर्व खेळाडूंनी दिलेल्या योगदानामुळेच भारताला जागतिक महिला सांघिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत ऐतिहासिक रौप्यपदक जिंकता आले, असे मत या संघाचे प्रशिक्षक आणि न खेळणारे कर्णधार अभिजित कुंटे यांनी व्यक्त केले. तसेच त्यांनी मेरी अ‍ॅन गोम्सच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले.
 • भारताला यंदा पहिल्यांदाच या स्पर्धेत पदक जिंकण्यात यश आले. अंतिम फेरीत भारताला रशियाकडून ०-२ असा पराभव पत्करावा लागला. मात्र, भारतीय संघाने कोनेरू हम्पीसारखी आघाडीची खेळाडू नसतानाही मिळवलेल्या यशाचा कुंटे यांना अभिमान आहे.
 • युरोपीय देशांत कोव्हिशिल्ड लशीला प्राधान्य असल्याने कोव्हॅक्सिन लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या हम्पीला व्हिसा मिळवण्यात अडचण आली.  पद्मिनी राऊतलाही याच समस्येचा सामना करावा लागला. त्यामुळे स्पर्धेला तीन दिवस शिल्लक असताना मेरीची भारतीय संघात निवड झाली.
 • ‘‘मेरी साखळीत केवळ तीन सामने खेळली. मात्र, तिने उपांत्यपूर्व फेरीत कझाकस्तानविरुद्ध दोन्ही सामने जिंकले. तसेच उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यातही तिने विजय मिळवला. मात्र, आमच्या या यशात प्रत्येकच खेळाडूची महत्त्वाची भूमिका होती,’’ असे कुंटे यांनी सांगितले.
 • ‘‘द्रोणावल्ली हरिकाने सर्व ११ सामने खेळले. भक्ती कुलकर्णी साखळीत चांगली खेळली. उपांत्य फेरीत तानिया सचदेवने निर्णायक विजय मिळवला,’’ असे कुंटे म्हणाले.
तब्बल सहा तासांनंतर Facebook, Instagram, WhatsApp हळूहळू पूर्वपदावर; झुकरबर्ग म्हणाला, “सॉरी, मला माहितीय : 
 • फेसबुकसह व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम ही लोकप्रिय समाजमाध्यमे सोमवारी रात्री ठप्प झाल्याने त्यांचे भारतासह जगभरातील कोट्यवधी वापरकर्ते अस्वस्थ झाल्याचं पहायला मिळालं. इंटरनेटवर ग्लोबल आऊटरेज म्हणजेच जागतिक स्तरावर खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेच्या तब्बल सहा तासांनंतर तिन्ही सेवा हळूहळू पुन्हा रुळावर येत आहेत.
 • एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामची सेवा सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे. असं असतानाच या तिन्ही सेवा पुरवणाऱ्या फेसबुक कंपनीचा कार्यकारी अध्यक्ष मार्क झुकरबर्गनेही या सर्व गोंधळावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
 • ट्विटरवरील व्हॉट्सअ‍ॅपच्या अधिकृत हॅण्डलवरुन वापरकर्त्यांची माफी मागण्यात आलीय. आज अनेकांना आमची सेवा वापरण्यात अडचणी त्यासाठी आम्ही क्षमस्व आहोत. व्हॉट्सअ‍ॅप पुन्हा हळूहळू आणि काळजीपूर्वक पद्धतीने सुरु करण्याचं काम आम्ही करत आहोत. तुम्ही दाखवलेल्या धैर्यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत. यासंदर्भात आम्हाला अधिक माहिती मिळाल्यास आम्ही ती तुमच्या पर्यंत नक्की पोहचवू, असं कंपनीने म्हटलं आहे.

 

Check Also

IN Today's News

IN Today’s News| 07 sept 2021| चालू घडामोडी

IN Today’s News| 07 sept 2021| चालू घडामोडी Get all the necessary information you need …