Home >> IN Today's News >> चालू घडामोडी | Current Affairs – ०४ ऑक्टोबर २०२१

चालू घडामोडी | Current Affairs – ०४ ऑक्टोबर २०२१

चालू घडामोडी | Current Affairs ०४ ऑक्टोबर २०२१

ऐतिहासिक ‘पिंक टेस्ट’ अनिर्णीत; स्मृती मंधानाला सामनावीर पुरस्कार :
 • भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघादरम्यान गुलाबी चेंडूने खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटी सामन्याचा निकाल समोर आला आहे. ऑस्ट्रेलियाला शेवटच्या दिवशी ३२ षटकात २७२ धावांचे आव्हान होते.
 • मात्र १५ षटकात त्यांच्या २ बाद ३२ धावा झाल्या असताना दोन्ही कप्तांनांनी हात मिळवत कसोटी अनिर्णीत राखण्याचा निर्णय घेतला. भारताची शतकवीर फलंदाज स्मृती मंधानाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
 • झुलन गोस्वामी आणि पूजा वस्त्राकर यांच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा टिकाव लागला नाही. त्यानंतर भारताने आपला दुसरा डाव ३७ षटकात ३ बाद १३५ धावांवर घोषित केला. सलामीवीर शफाली वर्माने ५२ धावा केल्या.
कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धा : मनूचा दुहेरी सुवर्णवेध :
 • ऑलिम्पिकपटू मनू भाकरच्या दुहेरी सुवर्णकमाईमुळे भारताने ‘आयएसएसएफ’ कनिष्ठ जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली. या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारताने चार सुवर्ण आणि दोन रौप्यपदकांवर नाव कोरले.
 • भारताला १० मीटर एअर पिस्तूल प्रकाराच्या मिश्र, महिला आणि पुरुष सांघिक अशा तिन्ही गटांत सुवर्णपदक जिंकण्यात यश आले. भारताची १९ वर्षीय नेमबाज मनूने या स्पर्धेत अचूक वेध साधताना तीन सुवर्णपदके आपल्या नावे केली आहेत.
राज्यात आजपासून शाळांची घंटा वाजणार :

अखेर राज्यातील शाळांची घंटा वाजणार आहे. सोमवारपासून (४ ऑक्टोबर) ग्रामीण भागात इयत्ता ५ वी ते १२ वी आणि शहरी भागात इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग भरतील. विशेष म्हणजे राज्य सरकारने शाळांना आज (३ ऑक्टोबर) एक परिपत्रक काढून शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षणोत्सव साजरा करण्यास सांगितलंय.

इतकंच नाही तर या कार्यक्रमांसह अधिकाऱ्यांच्या भेटींचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्याचेही निर्देश दिलेत.

 

ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचे निधन :
 • मराठीतील विनोदी लेखक व कथाकथनकार दत्ताराम मारुती मिरासदार यांचे आज निधन झाले आहे. त्यांचा जन्म १४ एप्रिल, १९२७ मध्ये झाला होता. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळानं त्यांचं निधन झालं आहे. ते ९४ वर्षाचे होते.
 • मिरासदार यांचे शिक्षण अकलूज, पंढरपूर येथे झाले होते. पुण्यात आल्यावर ते एम्‌.ए. झाले. काही वर्षे पत्रकारिता केल्यानंतर त्यांनी इ. स. १९५२ साली अध्यापनक्षेत्रात प्रवेश केला. पुण्याच्या कॅंप एज्युकेशनच्या शाळेत ते शिक्षक होते. १९६१ मध्ये ते मराठीचे प्राध्यापक झाले.
 • मराठीतील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, चिं.वि. जोशी, आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे यांनी जोपासलेली विनोदी लेखनाची परंपरा द. मा. मिरासदारांनी पुढे सुरू ठेवली. मिरासदारांच्या व्यंकूची शिकवणी, माझ्या बापाची पेंड, शिवाजीचे हस्ताक्षर, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी, हरवल्याचा शोध इत्यादी कथा उत्कृष्ट लिखाण आणि त्याचे उत्तम सादरीकरण यामुळे वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा, असे २४ कथासंग्रह, १८ विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर आहेत.
भारतीय अर्थव्यवस्थेचे मूलभूत घटक मजबूत :
 • वर्ष २०२१ मधील तिसरी तिमाही व चौथ्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पन्न हे करोनापूर्व पातळीच्या वर गेले असून भारतीय अर्थव्यवस्थेचे मूलभूत घटक मजबूत झाले आहेत, असे मत निती आयोगाचे माजी अध्यक्ष अरविंद पानगढिया यांनी रविवारी व्यक्त केले.
 •  त्यांनी सांगितले, की अर्थव्यवस्था पुन्हा मजबूत होण्याकडे वाटचाल करीत असली तरी कोविड १९ साथ संपुष्टात आणण्यासाठी देशात वेगाने व निर्णायक प्रयत्न झाले पाहिजेत. लसीकरणाच्या पातळीवर चांगल्या बातम्या  येत आहेत.
 • आता भारताची गाडी रूळावर येत असून यावर्षी जास्त विकास दर गाठण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने चालू आर्थिक वर्षांत विकास दराचा अंदाज पूर्वीच्या १०.५ टक्क्य़ांवरून ९.५ टक्के केला असून जागतिक बँकेने भारतीय अर्थव्यवस्था २०२१ मध्ये ८.३ टक्क्य़ांनी वाढेल असा अंदाज दिला आहे.
‘झायकोव्ह-डी’ लशीसाठी १९०० रुपये किंमत प्रस्तावित :
 • ‘झायकोव्ह-डी’ या करोना प्रतिबंधक लशीच्या किमतीबाबत केंद्र सरकार व झायडस कॅडिला कंपनी यांची चर्चा सुरू असतानाच, तीन मात्रांच्या या लशीसाठी १९०० रुपये अशी किंमत या कंपनीने सुचवली असल्याचे कळते.
 • तथापि, ही किंमत कमी करण्याबाबत सरकार वाटाघाटी करत असून, याबाबत अंतिम निर्णय या आठवडय़ात घेतला जाण्याची शक्यता असल्याचे या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले.
 • झायडस कॅडिलाच्या पहिल्या डीएनएवर आधारित सुईविरहित करोना प्रतिबंधक लशीचा लवकरच देशव्यापी लसीकरण मोहिमेत समावेश केला जाईल, असे सरकारने गुरुवारी सांगितले होते.
 • ‘तीन मात्रांच्या या लशीसाठी कंपनीने सर्व करांसह १९०० रुपयांची किंमत प्रस्तावित केली आहे. लशीच्या किमतीबाबत सर्व पैलूंचा फेरविचार करण्यास कंपनीला सांगण्यात आले असून, त्याबाबत अंतिम निर्णय या आठवडय़ात होईल’, असे एका सूत्राने सांगितले.

 

Check Also

IN Today's News

IN Today’s News| 07 sept 2021| चालू घडामोडी

IN Today’s News| 07 sept 2021| चालू घडामोडी Get all the necessary information you need …